एका नव्या दिशेचा शोध …. संदीप वासलेकर , राजहंस प्रकाशन.

नियतिचे संकेत वेळीच समजून घेऊन त्याला निश्चयाची जोड दिल्यास नवनिर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करता येते. त्यासाठी पैशांची गरज असतेच असं नाही . मोठ्या लोकांच्या पाठबळाचीही आवश्यकता नाही. यासाठी असामान्य बुद्धिमत्ता असणेही जरुरी नाही. लेखक म्हणतात जे मला शक्य झाले ते कोणत्याही युवकास शक्य आहे. यासाठी नियती आणि निश्चय यांचे गणित समजून घेण्याची गरज आहे. सर्वसाधारण मराठी कुटुंबात जन्म, डोंबिवलीतील एका चाळीत वास्तव्य,मराठी माध्यमाच्या शाळेतून दहावी पर्यंतचे शिक्षण आणि नंतर वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश. महाविद्यालयाचा शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच ‘ आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर संशोधन’ करून लेख लिहिला. या लेखाचे जगभर कौतुक झाले आणि अवघ्या 20 व्या वर्षापासून परदेश दौरे सुरू झाले. अनेक देशातील उच्चपदस्थ व्यक्ती संदीप वासलेकर यांना विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्याकरिता वैयक्तिक आमंत्रण देऊन बोलवून घेत. जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या व गुप्त बैठकांना संदीप वासलेकरांना खास आमंत्रण असे. जागतिक शांततायात्रेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. अनेक देशातील राजकीय नेत्यांशी दहशतवाद, पर्यावरण हानी, पाण्याचा प्रश्न, कुपोषण अशा विविध विषयांवर सात्यत्याने चर्चा करून त्यावर योग्य ते मार्गदर्शन करत. काही वर्षा पूर्वी अनेक देश भारतापेक्षा साधन-संपत्ती, विकासाच्या दृष्टिकोनातून कैक पटीने मागे होते. सध्या या देशांनी योग्य त्या मार्गाचा अवलंब करत,स्वच्छ राजकारण, अर्थकारण, समाजकारण या माध्यमातून प्रचंड प्रगती केली आहे. भारतालाही या सर्वांच्या सोबत घेऊन जाण्यासाठी, जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत संदीप वासलेकर भारतीय युवकांना त्यांचे ध्येय काय असावे हे सांगतात.युवकांनी डोळ्यावरची पट्टी काढून जग पाहिले पाहिजे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करणे थांबवून,सारासार विवेकाने जगात योग्य व अयोग्य काय ते जाणून घ्यायला पाहिजे. आपले जग, आपला देश, आपले शहर आणि गाव उज्ज्वल मार्गाने एका नव्या दिशेकडे नेण्यासाठी काय करता येईल? त्यात आपले योगदान काय असेल? याचा विचार केला पाहिजे. जेव्हा जगातील व आपल्या समाजातील सर्वात कमकुवत घटक प्रबळ होईल तेव्हाच आपले व्यक्तिगत जीवन सुधारेल, भावी पिढीच्या मंगलमय जीवनाची हमी मिळेल. यासाठी फक्त नवीन विचार करण्याची शक्ती पाहिजे व ती प्राप्त करण्यासाठी जगभर यशस्वी झालेल्या प्रयोगांची प्रक्रियांची माहिती समजून घेण्यासाठी हे पुस्तक लेखकांनी आपल्या समोर ठेवले आहे.

वाचकांना विशेषतः नव्या पिढीला परिवर्तनवादी विचारांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. नव्या पिढीने याचा लाभ घेणे देशहिताच्या, देशकल्याण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे..

Leave a comment