समर्थ रामदासांचे व्यवस्थापन लेखक – सुनील चिंचोलकर.“जय जय रघुवीर समर्थ”  लहानपणी एक शिरस्ता होता. शुभमं करोती व दररोज मनाचे श्लोक म्हणायचे. तेंव्हा फक्त म्हणत होतो न अर्थ समजता. पण ही छोटी पुस्तिका वाचली आणि मनाच्या श्लोकाचा अर्थ नव्याने समजला. एक एक पानावर एक व्यवस्थापनेचे उदाहरण दिल्याने वाचायला खुप छान आहे .• भगवान कृष्ण भारतीय व्यवस्थापनेचा जनक असे म्हंटले आहे. कारण जीवन पद्धतीतील कर्म कौशल्याला महत्त्व दिले. योग:कर्मसु कौशलम् • स्वातंत्र्यवीर सावरकरांना इटलीतील रामदास म्हंटले आहे.• स्वतःला बदलण्यासाठी अवगुणांचा त्याग करून सदगुणांची जोपासना केली पाहिजे.• प्रशिक्षणाद्वारे माणसे तयार करणे. उद्धव, वेणाबाई, अक्काबाई,दिवाकर गिरीधर, दिनकर हे लोक समर्थांनी तयार केले व यांनी पुन्हा जागोजागी मठ स्थापन करून समर्थांचे कार्य वाढविले.• श्रवण म्हणजे स्वतःला घडविण्याची साधना आहे.• आत्मपरीक्षणाद्वारे चुकांची दुरुस्ती करावी.• प्रयत्नांच्या साहाय्याने माणसाला हातावरच्या रेषा सुद्धा बदलता येतात.• समर्थ रोज पहाटे दोन तास सूर्यनमस्कार,सहा तास जप आणि ध्यान आणि भोजन विश्रांती नंतर विविध ग्रंथांचा अभ्यास करत. मन, मनगट, मेंदू यांच्या संतुलनासाठी.• समर्थांनी 15 व्या वर्षी 24 हजार श्लोकांचे वाल्मीकि रामायण लिहून काढले.दिसामाजी काहीतरी लिहावे.• कुणालाही आपले हस्ताक्षर वाचता यावे असे नीटनेटके असावे.• ग्रंथसंपदा प्राणापलीकडे जपून ठेवा.• भोजनाचे, स्वयंपाकाचे, वेळेचे, 24 तासांचे,मंदिराचे व्यवस्थापन असावे.• अखंड सावधान असावे.  शिवाजी महाराज, माल्थसचा सिद्धांत, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावरकर, सामान्य जनता, राजकारण, धर्मकारण अशी अनेक उदाहरणं स्पष्टीकरणा सहित दिल्याने समजायला सोपं आणि अत्यंत उपयुक्त अशी ही छोटी पुस्तिका सर्वांना वाचनीय अशीच आहे.       सुलभा तांबडे.

                युगंधर    लेखक – शिवाजी सावंत    पृष्ठ संख्या – 1047     महाभारत सिरीयल बघितली आहे. भागवत सप्ताह मध्ये कृष्ण लीला ऐकल्या होत्या. तरीही कृष्ण समजून घ्यायचा होता. कारण त्याला अनेकांनी स्थितप्रज्ञ म्हटलं जात. हेच जाणून घेण्यासाठी अगोदर युगान्त नंतर राधेय वाचली आणि आता झपाटल्या सारखी वाचली ती युगंधर. लेखकांनी श्रीकृष्ण, रुक्मिणी,दारूक द्रोपदी , अर्जुन,सात्यकी, उध्दव यांच्या मनोगतातून आपल्यासमोर युगंधर उभा केला आहे. जन्मानंतर लगेचच यमुना नदी पार करून गोकुळात प्रवेशला तेव्हापासून जलतत्त्वाचा हा युगंधर अखेरपर्यंत अनेक कारणांसाठी प्रवासच करत राहिला. त्यामुळे ही कादंबरी वाचून पूर्ण झाल्यानंतर आपोआपच स्थितप्रज्ञ ही संकल्पना समजून जाते. श्रीकृष्ण – या पहिल्याच मनोगतात श्रीकृष्ण आपल्याशी त्याच्या बालपणीचा प्रवास सांगत आहे. त्याच्या नामकरण विधीच्या वेळी गर्गमुनी येऊन सर्वांसमोर त्याची भविष्यवाणी सांगतात. गोकुळात पाळण्यात नाव ठेवले जाते कृष्ण आणि नंतर गोपाल, दामोदर, मुरलीधर, गोविंद…. वासुदेव अशी त्याचा नामोल्लेख केला जातो. गोकुळात बलराम दादा व इतर सवंगड्या सोबत  खोड्या करणे, दही, लोणी चोरून खाणे असं मजेत आठ दहा वर्ष बालपणाचा काळ होता.यासोबतच काकांकडून व्यायाम व संगीताचे धडे मिळत होते. यमुनेत मनसोक्त डुंबण, संवगड्याना मुरलीची धून एकवणं,( मुरलीच्या सुरावटीने गोकुळाला वेड लावलं त्यातिलच एक वेडी राधा म्हणजे )एकत्रित गोपभोज घेणं असं सुरळीत सुरु असतानाच कंसमामा कडून दोघांनाही बोलावणं येतं. त्यावेळी कळतं आपले जन्मदाते कंस मामाच्या कोठडीत जीवन कंठत आहेत. गोकुळ नगरीचा, राधेचा निरोप घेऊन कृष्ण गोकुळ सोडतो ते पुन्हा तिथे फिरकत नाही.कंस वधानंतर कंसाचा चिडलेला सासरा जरासंध मथुरेवर अनेक वेळा हल्ला करतो. यावर उपाय म्हणून कृष्ण दूर समुद्रात आपली द्वारका उभी करतो व मथुरा सोडतो. रुक्मिणी- स्वतःहून कृष्णाला प्रेम पत्र पाठवून त्याच्याशी लग्न केलेली कृष्णाची पहिली व अत्यंत प्रिय पत्नी म्हणजे रुक्मिणी.तीला तीन भाऊ त्यांनी तिचा विवाह शिशुपाल याच्याशी करण्याचे निश्चित केले होते. पण रुक्मिणी स्वतःहून कृष्णा सोबत पळून आली ती कायमची. त्यानंतर येणाऱ्या सातही राण्यांचे तिने आनंदाने स्वागत केले. रुक्मिणी सह कृष्णाला एकूण आठ राण्या व ८० बलराम दादा मात्र एक पत्नीव्रता होता व पुत्र असा मोठा परिवार होता. बलराम दादा एक पत्नीव्रता होता. उद्धव अविवाहित राहिला. दारूक – हा कृष्णाच्या रथाचा सारखे करणारा सारथी. सतत कृष्ण सेवेत तत्पर. कृष्णाने या सारख्याला अश्वयोग सांगितला. अश्व् हा सर्वात वेगवान प्राणी आहे युद्धासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याची तितक्याच प्रेमाने काळजी घ्यायची. तसा कृष्ण सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागणारा म्हणजेच प्रेमयोग शिकवणारा,वाटणारा त्यामुळे दारूक देखील कृष्णाचा सोबतीच होता. द्रोपदी – राधा व द्रौपदीच कृष्णाशी असणारं नातं शब्दबद्ध करणं अवघड. तिच्या अवघड स्वयंवर पण कुणालाच जिंकता येत नसल्याने कृष्ण ते मोडण्यासाठी उभा राहतो. कांही क्षणासाठी द्रौपदी त्याला बघते आणि तिच्याही मनी तो जीवनसाथी असं येतं तितक्यात एक ब्राम्हण वेशधारी युवक येऊन तो अवघड पण मोडतो आणि द्रौपदी त्याच्या गळ्यात वरमाला घालते. त्यावेळी ती कृष्णाची सखी होते.तिच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणीच्या वेळी कृष्ण तिच्या मदतीला धावून गेला. अर्जुन – कृष्णाचा सर्वात लाडका पांडव पुत्र पार्थ, धनुर्धर अर्जून.अर्जुनाकडेच केवळ कृष्ण उपदेश एकण्याची क्षमता आहे हे ओळखून होता त्याचा सखा. बलराम दादाचा रोष पत्तकरून सुभद्राचा आणि अर्जुन विवाह घडवून आणला. मित्र, मार्गदर्शक, गुरु, मामेभाऊ अशा अनेक नातेसंबंधातून अर्जुन कृष्ण वर्णन करत आहे. सात्यकी – द्वारकेचा सेनापती. कृष्णाला अनेक युद्ध करावी लागली. त्या सर्व युद्धाचा सेनापती सात्यकी. कुरुक्षेत्रावर आपल्या दहा मुलांसह युद्ध करणारा आणि एकाच वेळी या मुलांचा मृत्यू त्याच्या नजरेसमोर झाला. यातून सावरला तो केवळ कृष्णाचा प्रेमळ स्पर्श. सतत युद्धावर असल्यामुळे त्याला आई -वडिलांची भेट झाली नसल्याने कृष्णा स्वतः त्याला सोबत घेऊन त्याच्या आई वडिलांना भेटून आला. उध्दव – हा कृष्णाचा चुलत भाऊ,सतत दादा सोबतच. अगदी अखेर पर्यंत. अविवाहित राहिला कधीही शस्त्र हाती घेतले नाही. कृष्णाने त्याच्या अंतिम समयी त्याला उपदेश केला आणि त्याच्या कडून वचन घेतले. हा संदेश लोकांना सांगण्याचा तीच पुढे उध्दवगीता. जरी दिसायला इतकी जाडजुड कादंबरी असली तरी वाचायला सुरवात केली की कधी संपते कळतच नाही. वाचावी अशीच आहे.

सुलभा तांबडे


‘ योग्य प्रकारे अभिप्राय देणं ही एक कला असून आपण ती आत्मसात केली पाहिजे.’
अति महत्त्वकांक्षा, वाढत्या बौद्धिक गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर चालणारी धावपळ या सगळ्यांमध्ये जगणं हरवत चाललेला आजचा समाज. नात्यांमध्ये येणारी कटूता- दुरावा, वाढते घटस्फोट, तरुणाईतली व्यसनाधिता, वाढते वृद्धाश्रम, कामाच्या ठिकाणचे ताण तणाव या सगळ्याचा आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम. म्हणूनच गौर गोपाल दास यांनी या पुस्तकातून जीवनातील शाश्वत आनंद मिळविण्यासाठी आयुष्यात समतोल राखता आला पाहिजे हे अत्यंत सोप्या भाषाशैलीत आणि तेही गोष्टीरूपात अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे.
‘ आयुष्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी आपल्याला समतोल राखता येणे खूप महत्त्वाचा आहे.’ हा समतोल बाह्य आणि अंतर्गत असा साधता आला पाहिजे. स्वतःलाच काही प्रश्न विचारून जसे की, नैराश्य आहे का? वैताग आला आहे? माझ्या मनासारखं काही घडत नाही. आपल्या आयुष्यात असं होत असेल तर समजावं आपल्या आयुष्यातला समतोल ढासळला आहे.हा समतोल साधण्यासाठी लेखकांनी, आपलं वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान असे जीवनाचे चार भाग करून जीवनाचा समतोल साधता कसा साधता येतो. या संबंधी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक. अगदी हलकं -फुलकं, अतिशय सुंदर अशी वाक्यरचना मध्ये वाचण्यामुळे कळत नकळत पणे आपण आपल्या आयुष्यातील समतोल साधण्याकडे वळतो.
पुस्तकाच्या शेवटी एक कार्यतक्ता दिला आहे.. तो कसा भरावयाचा हे ही उद्याहरणे देऊन सांगितले आहे.

– सुलभा तांबडे

गोरा – रवींद्रनाथ टागोरमूळ कादंबरी बंगालीमध्ये,हिंदी अनुवादित – सच्चिदानंद वात्स्यायन

पुस्तक अभिप्राय -सुलभा तांबडे

गोरा म्हणजे गोरा रंग. गौरमोहन उर्फ गोरा हा या कादंबरीचा नायक. गोरा – सूचरीता, विनय – ललिता यांची प्रेमकथा.1880 मधे लेखकांनी लिहायला सुरवात केलेली ही कादंबरी. त्यावेळी ब्रिटिश राजवट, त्यावेळी भारतातील सामाजिक व राजकीय परिस्थिती, धार्मिक कट्टरता या संघर्षातून या चौघांची प्रेमकथा व त्यातून त्यांचा झालेला भावनिक विकास यातून जाणवतो. गौरमोहन हा आयरीश दांपत्याचा मुलगा पण गौराला जन्म देताच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने बंगाली कुटुंबातील कृष्णदयाल आणि आनंदमययी यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढविले. गोराचा जिवलग मित्र विनय. विनायलाही आई-वडील नसल्याने आनंदमयीने त्याला देखील आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले आहे. यांच्या घराजवळच परेश बाबू व वरादसुंदरी यांच्या तीन मुली, दत्तक मुलगी व मुलगा असे कुटुंब रहात आहेत. हे सर्व कलकत्ता इथे राहणारे. गोरा आणि विनय यांच्या बुद्धी, विचारांवर व व स्पष्ट वक्तेपणावर या कुटुंबातील सुचरिता व ललिता या मुली प्रभावीत होतात. इथूनच प्रेमकथा सुरु होते. या कथेमध्ये अविनाश, शशिपाल, महिम, पनीबाबू, हरिनमौसी अशी पात्रही आहेत. पण कादंबरी फिरते आहे त्या चौघामध्ये आणि धर्म, देशप्रेम, राजकारण, धर्मकारण, कट्टरता यामध्ये. याच कट्टरतेमुळे विनय आणि गोरा यांच्यामध्ये फूट पडते. गोरा विनय च्या विवाहाच्या वेळी उपस्थित राहत नाही व विनयशी संबंध तोडून टाकतो.गोराची दत्तक आई अनेक प्रयत्न करूनही गोरा ऐकत नाही. आनंदमयी समाज, मुलगा, पती यांना विरोध करून पुढे होऊन विनय व ललिताचा विवाह करते. कादंबरीच्या अगदी शेवटी गोराचे दत्तक पिता गोराला त्याच्या जन्माची कहाणी सांगतात. त्या क्षणी गोराची झालेली अवस्था, आत्तापर्यंत देशप्रेम,धर्म, स्पृश्य अस्पृश्यता सर्व गळून पडतं आणि फक्त *मानवजात* ही झालेली जाणीव. अशी अत्यंत उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी. रवींद्रनाथ टागोर यांचे निसर्गप्रेम, शिक्षणाच्या पद्धती, शांतिनिकेतन संकल्पना, कविता, इतर लेखन हे सर्वंच अत्यंत मनाला भावणारं. तरुणाईत उमलणारे प्रेम पण समाजाची, राष्ट्राची, धर्माची जाणीव आणि यातून तरुणाचा होणारा भावनिक विकास खुप सुंदररित्या वर्णीला आहे. कादंबरीतुन प्रत्येकवेळा त्यांचे निसर्गप्रेम वाचकाला नव्याने निसर्गाकडे पाहण्यास भाग पडते.

🌱🌱🦩🦢🦜 *पक्षी जाय दिगंतरा* 🐅🦚🦃🌳
*मारुती चितमपली*

या अगोदर *चकवा चांदण*, *निळवंती* वाचले आहे. लेखकांचे संपूर्ण आयुष्य जंगलात गेलेले व वन्यजीवशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय असल्याने लेखनही वन्यशास्त्र जीवावर आधारित. *चकवा चांदणं* ही मोठी कादंबरी आहे. या कादंबरीतून आपल्याला महाराष्ट्रातील अनेक जंगलामधील प्राणी,पक्षी,वनस्पती यांची माहिती मिळते. *निळवंती* छोटा कथासंग्रह आहे. *पक्षी जाय दिगंतरा* हा देखील कथासंग्रह आहे. या कथांमधून आपल्याला पक्षांमधील प्रेम, मिलन,दोघांनी मिळून घरटी बांधणे, पिलांना जन्म देणं व त्यांचे पालन पोषण करणे याची माहिती मिळते. घारीच घर, अडई व तिची पिल्लं, रानबदकं, घनवराच घरट, हुमा घुबड, रानगवे, रानमांजर, रानगौर अशा अनेक पक्षांची माहिती होते. पिपा चित्तीन आणि तिची पिल्लं किती माणसाळली होती हे वाचताना खरंच आश्चर्य वाटते. जंगलामध्ये रान कोंबड्याने बांग दिली की पहाटेची चाहूल हा संकेत, त्यानंतर ओळीने एकेक पक्षांचा आवाज कानी पडतो. सुरवात भृंगराजन, मग कोतवाल, मग शामा व बुलबुल त्यांचा हा क्रम ठरलेला आणि शेवटी कीहीड पक्षांचं हसणं हे झाले की हळूहळू सूर्योदय होतो. पूर्वी असणारी घनदाट चांगलं आता हळूहळू नामशेष होत आहेत. परिणामी तिथे आढळणाऱ्या प्राणी व पक्षांचा वावर देखील कमी होत आहे. लेखकाने या कथेमध्ये शेवटी ही खंत ही व्यक्त केली आहे.

एका नव्या दिशेचा शोध …. संदीप वासलेकर , राजहंस प्रकाशन.

नियतिचे संकेत वेळीच समजून घेऊन त्याला निश्चयाची जोड दिल्यास नवनिर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करता येते. त्यासाठी पैशांची गरज असतेच असं नाही . मोठ्या लोकांच्या पाठबळाचीही आवश्यकता नाही. यासाठी असामान्य बुद्धिमत्ता असणेही जरुरी नाही. लेखक म्हणतात जे मला शक्य झाले ते कोणत्याही युवकास शक्य आहे. यासाठी नियती आणि निश्चय यांचे गणित समजून घेण्याची गरज आहे. सर्वसाधारण मराठी कुटुंबात जन्म, डोंबिवलीतील एका चाळीत वास्तव्य,मराठी माध्यमाच्या शाळेतून दहावी पर्यंतचे शिक्षण आणि नंतर वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश. महाविद्यालयाचा शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच ‘ आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर संशोधन’ करून लेख लिहिला. या लेखाचे जगभर कौतुक झाले आणि अवघ्या 20 व्या वर्षापासून परदेश दौरे सुरू झाले. अनेक देशातील उच्चपदस्थ व्यक्ती संदीप वासलेकर यांना विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्याकरिता वैयक्तिक आमंत्रण देऊन बोलवून घेत. जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या व गुप्त बैठकांना संदीप वासलेकरांना खास आमंत्रण असे. जागतिक शांततायात्रेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. अनेक देशातील राजकीय नेत्यांशी दहशतवाद, पर्यावरण हानी, पाण्याचा प्रश्न, कुपोषण अशा विविध विषयांवर सात्यत्याने चर्चा करून त्यावर योग्य ते मार्गदर्शन करत. काही वर्षा पूर्वी अनेक देश भारतापेक्षा साधन-संपत्ती, विकासाच्या दृष्टिकोनातून कैक पटीने मागे होते. सध्या या देशांनी योग्य त्या मार्गाचा अवलंब करत,स्वच्छ राजकारण, अर्थकारण, समाजकारण या माध्यमातून प्रचंड प्रगती केली आहे. भारतालाही या सर्वांच्या सोबत घेऊन जाण्यासाठी, जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत संदीप वासलेकर भारतीय युवकांना त्यांचे ध्येय काय असावे हे सांगतात.युवकांनी डोळ्यावरची पट्टी काढून जग पाहिले पाहिजे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करणे थांबवून,सारासार विवेकाने जगात योग्य व अयोग्य काय ते जाणून घ्यायला पाहिजे. आपले जग, आपला देश, आपले शहर आणि गाव उज्ज्वल मार्गाने एका नव्या दिशेकडे नेण्यासाठी काय करता येईल? त्यात आपले योगदान काय असेल? याचा विचार केला पाहिजे. जेव्हा जगातील व आपल्या समाजातील सर्वात कमकुवत घटक प्रबळ होईल तेव्हाच आपले व्यक्तिगत जीवन सुधारेल, भावी पिढीच्या मंगलमय जीवनाची हमी मिळेल. यासाठी फक्त नवीन विचार करण्याची शक्ती पाहिजे व ती प्राप्त करण्यासाठी जगभर यशस्वी झालेल्या प्रयोगांची प्रक्रियांची माहिती समजून घेण्यासाठी हे पुस्तक लेखकांनी आपल्या समोर ठेवले आहे.

वाचकांना विशेषतः नव्या पिढीला परिवर्तनवादी विचारांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. नव्या पिढीने याचा लाभ घेणे देशहिताच्या, देशकल्याण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे..

‘ केवळ मानवतेसाठी………’

अब्दुल सत्तार इदी यांचे आत्मचरित्र
प्रकाशन — रोहन
शब्दांकन – तेहमिना दुराणी
अनुवाद – श्रीकांत लागू
इदी यांचा जन्म भारतातील पण फाळणीमुळे कराचीला स्थलांतरीत.
‘ आई शाळेत असताना मला दोन पैसे द्यायची आणि सांगायची – एक पैसा कुणा गरीब गरजूला दे आणि एक पैसा स्वतःसाठी खर्च कर आणि ज्याला द्यायचा तो माणूस खरोखरच गरजु आहे का याची खात्री कर.’ शाळेतून घरी परतल्यावर आई चौकशी करायची. खोटं बोलायला वावच नव्हता!!! लहान वयातच ही शिकवण. त्यामुळे पुढील आयुष्यात इदी गरीब, गरजू,आपत्तीग्रस्तांचे मसीहा झाले.
आईनेच सेवाभावी वृत्तीचे बीज पेरल्याने , स्वकष्टाने थोडी रक्कम हातात आल्यावर मीठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांचे जाळे विणले. कुठेही नैसर्गिक व मानवी आपत्ती असेल तर त्वरित इदीचे कार्य सुरू. मृतांना दफन करणं, जखमींना त्वरित दवाखान्यात भरती करणे. ही कामे करत करतच अनेक बेवारस व मतिमंद लोकांना भरती करून त्यांची सेवा शुश्रूषा करणे असा कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत गेला. स्वतः अत्यंत शिस्तबद्ध, कोणतेही काम करण्यास पुढे, पारदर्शक व्यवहार यामुळे त्यांनी स्वतः सारखी शिस्तबद्ध अशी सेवा करण्याची मोठी फळी उभी केली. कित्येक वर्ष केवळ एक रुग्णवाहिका सोबतच सुरू केलेला प्रवास सध्या अनेक रुग्णवाहीका,विमान, हेलिकॉप्टर, मालवाहू वाहने इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. अनेक देशात इदी फाउंडेशन संस्था उभी असून एकाच तत्त्वानुसार काम करत आहे. सेवावृत्तीने काम करणाऱ्या संस्थांना रुग्णवाहिका भेट दिले आहेत.
इदी फाउंडेशनचा वटवृक्ष उभा करताना अनंत अडचणी आल्या, अनेक धमक्या , असंख्य आणि घाणेरडे आरोप करण्यात आले, सत्ताधाऱ्यांनी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.पण इदी डगमगले नाहीत कारण देणारे हातही तितकेच होते. रस्त्यात भीक मागून भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधीची उभारणी केली . अत्यंत साधी राहणी, स्वतःसाठी मोजकाच खर्च, प्रसिद्धीपासून लांब. केवळ सेवाकार्यमानवता ही मूल्य आचरणात आणली. त्यांच्या या कार्यात त्यांच्या कुटुंबियांचे सहकार्य अनमोल आहे.


त्यांचे हे प्रेरणादायी आत्मकथन ‘ केवळ मानवतेसाठी…..’
अनेकदा वाचुन प्रेरणा घेण्यासारखेच आहे.

सुलभा तांबडे

रावण – राजा राक्षसांचा

2022 नवीन वर्षातील नवीन संकल्प. दर महिन्यात एक पुस्तक वाचून पूर्ण करायचे. संकल्पाप्रमाणे जानेवारीतील ‘ रावण-राजा राक्षसांचा ‘ ही शरद तांदळे लिखित New Era पब्लिकेशन ची कादंबरी वाचून पूर्ण केली.
रावण म्हणजे रामायणातील खलनायक क्रूर, अहंकारी, दहा-तोंडे असलेला राक्षस अशीच प्रतिमा समोर येते. पण कादंबरी वाचन करताना सुरुवातीला रावणाबद्दल असणारी ही प्रतिमा हळूहळू बदलत गेली. लेखकाने अतिशय सुंदररित्या रावणाची व्यक्तिरेखा रेखाटली आहे.’दशग्रीव ते रावण’ असा प्रवास कादंबरीमध्ये रेखाटला आहे. इतर पात्रांचा ही वर्णन उत्तम पद्धतीने केल्यामुळे वाचकाला कादंबरी खिळवून ठेवते.
दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीचा पाया रचला.’रक्ष:इति राक्षस:’. साम्राज्यातील जनतेलाही सोन्याची घर बांधून देणारा रावण. एक मातृभक्त, महान शिवभक्त, आज्ञाधारक शिष्य, जबाबदार बंधू, लढाऊ वृत्तीचा योद्धा, प्रेमळ पती, मार्गदर्शक व पिता अशा अनेक नात्यात बांधला गेलेला रावण. शिवतांडव रचणारा, रुद्रवीणा , बुद्धिबळ, रावणसंहिता, कुमारतंत्र यांची रचना करून ज्ञानार्जन करणारा रावण. अगदी अंतिम क्षणी लक्ष्मणाचे शिष्यत्व स्वीकारून त्याला जीवनाचे सार सांगणारा राक्षस राज रावण. आईचा शब्द हा राक्षस संस्कृतीतील प्रमाण असेल असा मातृभक्त रावण. असे नवनवीन पैलू रावणाचे या कादंबरी वाचनाने ज्ञात झाले. तरीही कादंबरीतील रावणाची क्रूरता वाचताना मन सुन्न होते.
लेखकाने रावणाच्या अनेक कलागुणांची ओळख करून दिल्याने वाचकांचा दृष्टिकोनात नक्कीच फरक पडेल.
वाचकहो कादंबरी जरूर वाचा.
– सुलभा तांबडे

द लास्ट गर्ल

I want to be the last girl in the world with a story like mine- .अशी कहाणी असलेली मी जगातील शेवटचीच मुलगी असावी.2018 च्या शांतता नोबेल ची मानकरी नादिया मुराद च्या आत्मकथेतील हे शेवटचं वाक्य आहे. नादिया मुराद इराकमधील कोचो खेड्यातील सर्वसामान्य यजीदी संयुक्त कुटुंबातील 21 वर्षाची तरुणी. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत तुटपुंजे तरीही आनंदी आणि समाधानी असणारे हे कुटुंब. कोचो हे यजीदीच गाव, इराकच्या सिंजर प्रदेशातील दक्षिणी टोकाचं, भटके शेतकरी व मेंढपाळांनी बसवलेले. शेजारच्या इराकी सुन्नी, अरब लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवून अत्यंत सामान्य जीवन जगणारे. इराक मध्ये युद्ध सुरू झाले आणि शेजारी असणाऱ्या खेड्यामध्ये सलोख्याच्या संबंधांचे रूपांतर तिरस्कारत होऊन हिंसाचार परस्परांमध्ये सुरू झाला. लेखिका म्हणते इथूनच दहशतवादाला सुरुवात झाली..!!! कोचो मधील खेड्यातून सुरुवातीला कधी कोंबड्या तर कधी मेंढ्या पळवून नेल्या जाऊ लागल्या. काही दिवसांनी माणसांना पळवून त्यांच्या घरातील इतर सदस्यांना धमकी दिली जाऊ लागली. धर्म बदलायला तयार रहा नाहीतर पळवून नेलेल्या व्यक्तींना मारून टाकू. असं करत करत एक दिवस संपूर्ण कोचोला आयसिसने वेढा दिला. गावातील लोक बाहेरच्या शहरातील आपल्या नातेवाईकांना फोन करून मदतीची याचना करत होते. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. गावातील सर्व रहिवाशांना एका शाळेत नेऊन त्यांची पुरुष, लहान मुले, विवाहित अविवाहित तरुण वयस्क स्त्रिया अशी विभागणी केली. पुरुषांना एकाच वेळी गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. वयस्क महिलांना देखील याच पद्धतीने मारून सामूहिक कबरीत दफन करण्यात आले. लहान मुलांना ब्रेनवॉश करून आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत पाठविले. विवाहित अविवाहित अशा सर्व तरुणींना सबाया / सेक्स गुलाम ( सेक्स स्लेव्ह ) म्हणून विकायला आणि वापरायला सुरुवात केली. कोचो मधील झालेल्या हत्याकांड यामध्ये नादिया मुराद च्या सहा भावांना व आईलाही मारले, तिच्यासह सर्व बहिणींना, भाच्यांना व गावातील सर्व तरुणींना सबाया बनविले. अशा रीतीने धर्मांधतेचा कट्टरतेने सुखी-समाधानी कुटुंबाची व संपूर्ण कोचो गावची वाताहात झाली. सुरुवातीला नादीयाला हाजी सलमान की जो पेशाने न्यायाधीश होता आणि त्याचा दरारा होता. त्याने नादियाला विकत घेतले. तिला तो प्रचंड मारहाण करत असे व तिच्या धर्माबद्दल सतत वाईट बोलत असे. नादीयाने त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ती दुर्दैवाने सापडली तेव्हा हाजीने तिला चाबकाने फोडून काढले आणि आपल्या सहा सुरक्षारक्षकांना तिच्यावर बलात्कार करण्यास सांगितले अगदी ती बेशुद्ध पडेपर्यंत. या घटनेनंतर तिला विकण्यात आले. जाणे तिला विकत घेतले त्याने व त्याच्या ड्रायव्हरने मिळून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला चेकपोस्टवर सोडलं की जिथे येणाऱ्या-जाणाऱ्या कुणा ही दहशतवाद्यांसाठी!!!!!. तिच्यावर हा अत्याचार सतत तीन महिने सुरू होता. एके दिवशी चेक पोस्टवरून एक दहशतवादी तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथून तिने धाडसी पलायन केले…….! नादिया सारखाच अनेक तरुणींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण काही जणींना यश-अपयश आले काही तरुणीने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली तर काहींची हत्या करण्यात आली. पलायन करणार्‍या तरुणींना या आंधळ्या,बहिऱ्या लालची, मुक्या समाजाने त्या तरुणिना पुन्हा दहशतवाद्यांच्या तावडीत दिले. इतकी भयानक परिस्थिती असूनही नादिया ला मात्र एका सुन्नी कुटुंबाचा आधार मिळतो या कुटुंबातील सर्वजण जिवावर उदार फोन नादियाला पळून जाण्यास मदत करतात.

जागतिक महासत्तांचे राजकारण, शस्त्रास्त्र निर्मितीला बंदी घालूनही चोरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मिती करावयाची आणि दहशतवाद्यांना छुप्या मार्गाने पोचवायची. असा छुपा पाठिंबा मिळत असल्याने दहशतवादी संघटना फोफावत आहेत.2014 अगदी अलीकडच्या काळात इतका मोठा नरसंहार झाला, महिलांच्या वर शब्दातीत होणारा अत्याचार नादीयाच्या सुटकेनंतर समजतो याचे वैषम्य वाटते. नादीयावर इतके अत्याचार होऊनही ती म्हणते, “ मी कधीच आत्महत्येचा विचार केला, नाही ना मला कधी स्वतःची घृणा वाटली”. नादिया जिवंत राहिली स्वतः वरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, आई- भावांच्या, गावकऱ्यांच्या (यजीदीच्या ) हत्यांची दाद मागण्यासाठी आणि आयसिसच्या ताब्यातील हजारो यजदी तरुणींना, लहान मुलांना सोडविण्यासाठी!!.
अशा या अत्यंत साहसी नादिया चे आत्मकथन अनेकांना प्रेरणा देणारे ठरो.
ता. क. – सध्या नादिया यजीदी नेता, स्त्रियांच्या हक्कांची पुरस्कर्ती, नोबेल शांतता पुरस्काराची मानकरी संयुक्त राष्ट्रसंघाची सदिच्छा दूत बनली आहे.

नॉट विदाऊट माय डॉटर….

पुस्तक परिचय मालिकेतील आणखी एक पुस्तक की ज्या असंख्य वाचकांनी या पुस्तकाला पसंती दिली आहे, असे अत्यंत लोकप्रिय व उत्सुकता वाढवणारे पुस्तक म्हणजे,’नॉट विदाऊट माय डॉटर ‘ खरंतर हे आत्मकथननच बेट्टी महमूदी यांच्या वाट्याला आलेला हा संघर्ष त्यांनी विल्यम हाफर यांच्या सहाय्याने वाचकांच्या समोर आणला आहे. मूळ इंग्रजी भाषेतील हे आत्मकथन याचे मराठी अनुवाद केला आहे सौ लीना सोहोनी यांनी.

अमेरिकेसारख्या प्रगतशील देशांमध्ये लहानाची मोठी झालेली बेट्टी. पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन आपल्या दोन मुलांना घेऊन राहात होत्या. घटस्फोटामुळे मानसिक तणाव व प्रचंड निराशा त्यांच्या वाट्याला आली होती. पुन्हा विवाहाच्या फंदात पडायचं नाही असा निश्चय होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अचानक उद्भवणारे शारीरिक दुखणं आणि त्यातूनच तिची भेट डॉ. सय्यद बोझोर्ग महमूदी उर्फ मुडी झाली.यांची भेट प्रथम पेशंट- डॉक्टर, मित्र -मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी अशा या फुलणाऱ्या नात्याचा शेवट विवाहामध्ये झाला. सात वर्ष सुखाचा संसार,मोहताब या गोंडस मुलीला जन्म सगळं कसं स्वप्नवत सुरू असतानाच, अचानक मूडी ने आपण इराणला म्हणजेच मुडीच्या मुळच्या देशात जाऊन कुटुंबियांना भेटून परत केव्हाही अमेरिकेत येऊ शकतो असे आश्वासन देऊन बेट्टीला व मोहताबला इराणला घेऊन गेला.

मूडी हा मुळचा ईरान देशातील लहानपणी आई वडील निवर्तलेले,बहिणीने लहानाचं मोठं केलं. शिक्षणासाठी अमेरिकेत आलेला मुडी प्रथम शिक्षण व नंतर नोकरी असं करत अमेरिकेतच रमला व बेट्टीवर उपचार करत करत बेट्टीच्या प्रेमात पडून तिच्याशी विवाहबद्ध झाला. कालांतराने होणारी राजकीय उलथापालथ त्यातून स्वदेशी लोक एकत्र येणं,बैठका,चर्चा,पत्रक काढणं हे सुरू झाले. अमेरिके विषयी द्वेष यातूनच पती-पत्नीमध्ये वाद – विवाद होऊ लागले. अधेमध्ये नातेवाईकांचे फोने येणं, नातेवाईक यांना भेटणं सुरूच राहिल्याने एक दिवस मुडीने बेट्टीला आपण इराणला जाऊन माझ्या नातेवाईकांना भेटून परत अमेरिकेत येऊ असं आश्वासन देऊन मुडी,बेट्टी व मोहताब यांना घेऊन मायदेशी परतला. हे सर्व जण इराणच्या विमानतळावर उतरले व तिथूनच बेट्टीच्या संघर्षाला सुरुवात झाली.

दोन देशाच्या संस्कृतीतील प्रचंड विभिन्नता, स्त्रियांचे पोशाख, स्त्रियांचा दर्जा, कायदे, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींशी जुळवून घेणे बेट्टीला अशक्य झाले. परत जाण्याची तारीख जवळ येऊ लागली पण मुडी जाण्याचे नावच काढेना आणि एक दिवस मुडीने बेट्टीला खडसावले,’ आता तू इथेच राहायचं समजलं?तू आता इराण सोडून कधीच जायचं नाही, मरेपर्यंत इथंच राहायचं!’. बेट्टीला मनातून ज्याची भीती वाटत होती तेच घडले. ती प्रचंड चिडली, रडली पण कशाचाच परिणाम मूडीवर झाला नाही. बेट्टीला अठरा महिने जीवघेणा संघर्ष करावा लागला. अनेकदा नवऱ्याकडून प्रचंड मायलेकींना मारहाण करण्यात आली, अपमान तर सततच होत होता, त्या दोघी ना नजर कैदेत ठेवण्यात आले. काही दिवस मायलेकींची ताटातूट करण्यात आली. बेट्टीला आपल्या आई-वडिलांना चोरून फोन करावा लागत असे. सुटकेच्या प्रयत्नासाठी एमबसी मध्ये चोरून जात होती. अनेकांना सुटकेसाठी गयावया करत होती. इराणी रीतीरिवाजाप्रमाणे आपल्याला अमेरिकेला सुखरूप परत जायला मिळू दे म्हणून नवस बोलत होती. बेट्टी वडीलांच्या ‘ इच्छा तिथे मार्ग ‘ या प्रेरणा देणाऱ्या वाक्यामुळे सतत प्रयत्न करत राहिली. अचानक या तिच्या प्रयत्नांना यश आलं. एका अनामिक व्यक्तीने तिला अमेरिकेमध्ये पोहोचविण्याचे आश्वासन दिले. पण त्यांनी जो मार्ग सांगितला तो अत्यंत बेभरवशाचा, खडतर असा होता. तरीही तिने मोहताबला सोबत घेऊन हे धाडसी पाऊल उचललं आणि सुदैवानं ती सुखरूप आपल्या मायदेशी परतली. बेट्टी म्हणते इराण मध्ये चांगले वाईट दोन्ही अनुभव आले. तिथल्याच लोकांनी तिला परतीच्या प्रवासातही मदत केली. असे हे अत्यंत रोमांचकारी जिद्दी बेट्टीचे आत्मकथन नक्की वाचावे असेच आहे.