पुस्तक अभिप्राय -सुलभा तांबडे
गोरा म्हणजे गोरा रंग. गौरमोहन उर्फ गोरा हा या कादंबरीचा नायक. गोरा – सूचरीता, विनय – ललिता यांची प्रेमकथा.1880 मधे लेखकांनी लिहायला सुरवात केलेली ही कादंबरी. त्यावेळी ब्रिटिश राजवट, त्यावेळी भारतातील सामाजिक व राजकीय परिस्थिती, धार्मिक कट्टरता या संघर्षातून या चौघांची प्रेमकथा व त्यातून त्यांचा झालेला भावनिक विकास यातून जाणवतो. गौरमोहन हा आयरीश दांपत्याचा मुलगा पण गौराला जन्म देताच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने बंगाली कुटुंबातील कृष्णदयाल आणि आनंदमययी यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढविले. गोराचा जिवलग मित्र विनय. विनायलाही आई-वडील नसल्याने आनंदमयीने त्याला देखील आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले आहे. यांच्या घराजवळच परेश बाबू व वरादसुंदरी यांच्या तीन मुली, दत्तक मुलगी व मुलगा असे कुटुंब रहात आहेत. हे सर्व कलकत्ता इथे राहणारे. गोरा आणि विनय यांच्या बुद्धी, विचारांवर व व स्पष्ट वक्तेपणावर या कुटुंबातील सुचरिता व ललिता या मुली प्रभावीत होतात. इथूनच प्रेमकथा सुरु होते. या कथेमध्ये अविनाश, शशिपाल, महिम, पनीबाबू, हरिनमौसी अशी पात्रही आहेत. पण कादंबरी फिरते आहे त्या चौघामध्ये आणि धर्म, देशप्रेम, राजकारण, धर्मकारण, कट्टरता यामध्ये. याच कट्टरतेमुळे विनय आणि गोरा यांच्यामध्ये फूट पडते. गोरा विनय च्या विवाहाच्या वेळी उपस्थित राहत नाही व विनयशी संबंध तोडून टाकतो.गोराची दत्तक आई अनेक प्रयत्न करूनही गोरा ऐकत नाही. आनंदमयी समाज, मुलगा, पती यांना विरोध करून पुढे होऊन विनय व ललिताचा विवाह करते. कादंबरीच्या अगदी शेवटी गोराचे दत्तक पिता गोराला त्याच्या जन्माची कहाणी सांगतात. त्या क्षणी गोराची झालेली अवस्था, आत्तापर्यंत देशप्रेम,धर्म, स्पृश्य अस्पृश्यता सर्व गळून पडतं आणि फक्त *मानवजात* ही झालेली जाणीव. अशी अत्यंत उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी. रवींद्रनाथ टागोर यांचे निसर्गप्रेम, शिक्षणाच्या पद्धती, शांतिनिकेतन संकल्पना, कविता, इतर लेखन हे सर्वंच अत्यंत मनाला भावणारं. तरुणाईत उमलणारे प्रेम पण समाजाची, राष्ट्राची, धर्माची जाणीव आणि यातून तरुणाचा होणारा भावनिक विकास खुप सुंदररित्या वर्णीला आहे. कादंबरीतुन प्रत्येकवेळा त्यांचे निसर्गप्रेम वाचकाला नव्याने निसर्गाकडे पाहण्यास भाग पडते.