
‘ योग्य प्रकारे अभिप्राय देणं ही एक कला असून आपण ती आत्मसात केली पाहिजे.’
अति महत्त्वकांक्षा, वाढत्या बौद्धिक गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर चालणारी धावपळ या सगळ्यांमध्ये जगणं हरवत चाललेला आजचा समाज. नात्यांमध्ये येणारी कटूता- दुरावा, वाढते घटस्फोट, तरुणाईतली व्यसनाधिता, वाढते वृद्धाश्रम, कामाच्या ठिकाणचे ताण तणाव या सगळ्याचा आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम. म्हणूनच गौर गोपाल दास यांनी या पुस्तकातून जीवनातील शाश्वत आनंद मिळविण्यासाठी आयुष्यात समतोल राखता आला पाहिजे हे अत्यंत सोप्या भाषाशैलीत आणि तेही गोष्टीरूपात अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे.
‘ आयुष्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी आपल्याला समतोल राखता येणे खूप महत्त्वाचा आहे.’ हा समतोल बाह्य आणि अंतर्गत असा साधता आला पाहिजे. स्वतःलाच काही प्रश्न विचारून जसे की, नैराश्य आहे का? वैताग आला आहे? माझ्या मनासारखं काही घडत नाही. आपल्या आयुष्यात असं होत असेल तर समजावं आपल्या आयुष्यातला समतोल ढासळला आहे.हा समतोल साधण्यासाठी लेखकांनी, आपलं वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान असे जीवनाचे चार भाग करून जीवनाचा समतोल साधता कसा साधता येतो. या संबंधी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक. अगदी हलकं -फुलकं, अतिशय सुंदर अशी वाक्यरचना मध्ये वाचण्यामुळे कळत नकळत पणे आपण आपल्या आयुष्यातील समतोल साधण्याकडे वळतो.
पुस्तकाच्या शेवटी एक कार्यतक्ता दिला आहे.. तो कसा भरावयाचा हे ही उद्याहरणे देऊन सांगितले आहे.
– सुलभा तांबडे