सुलभा तांबडे
युगंधर लेखक – शिवाजी सावंत पृष्ठ संख्या – 1047 महाभारत सिरीयल बघितली आहे. भागवत सप्ताह मध्ये कृष्ण लीला ऐकल्या होत्या. तरीही कृष्ण समजून घ्यायचा होता. कारण त्याला अनेकांनी स्थितप्रज्ञ म्हटलं जात. हेच जाणून घेण्यासाठी अगोदर युगान्त नंतर राधेय वाचली आणि आता झपाटल्या सारखी वाचली ती युगंधर. लेखकांनी श्रीकृष्ण, रुक्मिणी,दारूक द्रोपदी , अर्जुन,सात्यकी, उध्दव यांच्या मनोगतातून आपल्यासमोर युगंधर उभा केला आहे. जन्मानंतर लगेचच यमुना नदी पार करून गोकुळात प्रवेशला तेव्हापासून जलतत्त्वाचा हा युगंधर अखेरपर्यंत अनेक कारणांसाठी प्रवासच करत राहिला. त्यामुळे ही कादंबरी वाचून पूर्ण झाल्यानंतर आपोआपच स्थितप्रज्ञ ही संकल्पना समजून जाते. श्रीकृष्ण – या पहिल्याच मनोगतात श्रीकृष्ण आपल्याशी त्याच्या बालपणीचा प्रवास सांगत आहे. त्याच्या नामकरण विधीच्या वेळी गर्गमुनी येऊन सर्वांसमोर त्याची भविष्यवाणी सांगतात. गोकुळात पाळण्यात नाव ठेवले जाते कृष्ण आणि नंतर गोपाल, दामोदर, मुरलीधर, गोविंद…. वासुदेव अशी त्याचा नामोल्लेख केला जातो. गोकुळात बलराम दादा व इतर सवंगड्या सोबत खोड्या करणे, दही, लोणी चोरून खाणे असं मजेत आठ दहा वर्ष बालपणाचा काळ होता.यासोबतच काकांकडून व्यायाम व संगीताचे धडे मिळत होते. यमुनेत मनसोक्त डुंबण, संवगड्याना मुरलीची धून एकवणं,( मुरलीच्या सुरावटीने गोकुळाला वेड लावलं त्यातिलच एक वेडी राधा म्हणजे )एकत्रित गोपभोज घेणं असं सुरळीत सुरु असतानाच कंसमामा कडून दोघांनाही बोलावणं येतं. त्यावेळी कळतं आपले जन्मदाते कंस मामाच्या कोठडीत जीवन कंठत आहेत. गोकुळ नगरीचा, राधेचा निरोप घेऊन कृष्ण गोकुळ सोडतो ते पुन्हा तिथे फिरकत नाही.कंस वधानंतर कंसाचा चिडलेला सासरा जरासंध मथुरेवर अनेक वेळा हल्ला करतो. यावर उपाय म्हणून कृष्ण दूर समुद्रात आपली द्वारका उभी करतो व मथुरा सोडतो. रुक्मिणी- स्वतःहून कृष्णाला प्रेम पत्र पाठवून त्याच्याशी लग्न केलेली कृष्णाची पहिली व अत्यंत प्रिय पत्नी म्हणजे रुक्मिणी.तीला तीन भाऊ त्यांनी तिचा विवाह शिशुपाल याच्याशी करण्याचे निश्चित केले होते. पण रुक्मिणी स्वतःहून कृष्णा सोबत पळून आली ती कायमची. त्यानंतर येणाऱ्या सातही राण्यांचे तिने आनंदाने स्वागत केले. रुक्मिणी सह कृष्णाला एकूण आठ राण्या व ८० बलराम दादा मात्र एक पत्नीव्रता होता व पुत्र असा मोठा परिवार होता. बलराम दादा एक पत्नीव्रता होता. उद्धव अविवाहित राहिला. दारूक – हा कृष्णाच्या रथाचा सारखे करणारा सारथी. सतत कृष्ण सेवेत तत्पर. कृष्णाने या सारख्याला अश्वयोग सांगितला. अश्व् हा सर्वात वेगवान प्राणी आहे युद्धासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याची तितक्याच प्रेमाने काळजी घ्यायची. तसा कृष्ण सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागणारा म्हणजेच प्रेमयोग शिकवणारा,वाटणारा त्यामुळे दारूक देखील कृष्णाचा सोबतीच होता. द्रोपदी – राधा व द्रौपदीच कृष्णाशी असणारं नातं शब्दबद्ध करणं अवघड. तिच्या अवघड स्वयंवर पण कुणालाच जिंकता येत नसल्याने कृष्ण ते मोडण्यासाठी उभा राहतो. कांही क्षणासाठी द्रौपदी त्याला बघते आणि तिच्याही मनी तो जीवनसाथी असं येतं तितक्यात एक ब्राम्हण वेशधारी युवक येऊन तो अवघड पण मोडतो आणि द्रौपदी त्याच्या गळ्यात वरमाला घालते. त्यावेळी ती कृष्णाची सखी होते.तिच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणीच्या वेळी कृष्ण तिच्या मदतीला धावून गेला. अर्जुन – कृष्णाचा सर्वात लाडका पांडव पुत्र पार्थ, धनुर्धर अर्जून.अर्जुनाकडेच केवळ कृष्ण उपदेश एकण्याची क्षमता आहे हे ओळखून होता त्याचा सखा. बलराम दादाचा रोष पत्तकरून सुभद्राचा आणि अर्जुन विवाह घडवून आणला. मित्र, मार्गदर्शक, गुरु, मामेभाऊ अशा अनेक नातेसंबंधातून अर्जुन कृष्ण वर्णन करत आहे. सात्यकी – द्वारकेचा सेनापती. कृष्णाला अनेक युद्ध करावी लागली. त्या सर्व युद्धाचा सेनापती सात्यकी. कुरुक्षेत्रावर आपल्या दहा मुलांसह युद्ध करणारा आणि एकाच वेळी या मुलांचा मृत्यू त्याच्या नजरेसमोर झाला. यातून सावरला तो केवळ कृष्णाचा प्रेमळ स्पर्श. सतत युद्धावर असल्यामुळे त्याला आई -वडिलांची भेट झाली नसल्याने कृष्णा स्वतः त्याला सोबत घेऊन त्याच्या आई वडिलांना भेटून आला. उध्दव – हा कृष्णाचा चुलत भाऊ,सतत दादा सोबतच. अगदी अखेर पर्यंत. अविवाहित राहिला कधीही शस्त्र हाती घेतले नाही. कृष्णाने त्याच्या अंतिम समयी त्याला उपदेश केला आणि त्याच्या कडून वचन घेतले. हा संदेश लोकांना सांगण्याचा तीच पुढे उध्दवगीता. जरी दिसायला इतकी जाडजुड कादंबरी असली तरी वाचायला सुरवात केली की कधी संपते कळतच नाही. वाचावी अशीच आहे.
सुलभा तांबडे