2022 नवीन वर्षातील नवीन संकल्प. दर महिन्यात एक पुस्तक वाचून पूर्ण करायचे. संकल्पाप्रमाणे जानेवारीतील ‘ रावण-राजा राक्षसांचा ‘ ही शरद तांदळे लिखित New Era पब्लिकेशन ची कादंबरी वाचून पूर्ण केली.
रावण म्हणजे रामायणातील खलनायक क्रूर, अहंकारी, दहा-तोंडे असलेला राक्षस अशीच प्रतिमा समोर येते. पण कादंबरी वाचन करताना सुरुवातीला रावणाबद्दल असणारी ही प्रतिमा हळूहळू बदलत गेली. लेखकाने अतिशय सुंदररित्या रावणाची व्यक्तिरेखा रेखाटली आहे.’दशग्रीव ते रावण’ असा प्रवास कादंबरीमध्ये रेखाटला आहे. इतर पात्रांचा ही वर्णन उत्तम पद्धतीने केल्यामुळे वाचकाला कादंबरी खिळवून ठेवते.
दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीचा पाया रचला.’रक्ष:इति राक्षस:’. साम्राज्यातील जनतेलाही सोन्याची घर बांधून देणारा रावण. एक मातृभक्त, महान शिवभक्त, आज्ञाधारक शिष्य, जबाबदार बंधू, लढाऊ वृत्तीचा योद्धा, प्रेमळ पती, मार्गदर्शक व पिता अशा अनेक नात्यात बांधला गेलेला रावण. शिवतांडव रचणारा, रुद्रवीणा , बुद्धिबळ, रावणसंहिता, कुमारतंत्र यांची रचना करून ज्ञानार्जन करणारा रावण. अगदी अंतिम क्षणी लक्ष्मणाचे शिष्यत्व स्वीकारून त्याला जीवनाचे सार सांगणारा राक्षस राज रावण. आईचा शब्द हा राक्षस संस्कृतीतील प्रमाण असेल असा मातृभक्त रावण. असे नवनवीन पैलू रावणाचे या कादंबरी वाचनाने ज्ञात झाले. तरीही कादंबरीतील रावणाची क्रूरता वाचताना मन सुन्न होते.
लेखकाने रावणाच्या अनेक कलागुणांची ओळख करून दिल्याने वाचकांचा दृष्टिकोनात नक्कीच फरक पडेल.
वाचकहो कादंबरी जरूर वाचा.
– सुलभा तांबडे