‘ केवळ मानवतेसाठी………’

अब्दुल सत्तार इदी यांचे आत्मचरित्र
प्रकाशन — रोहन
शब्दांकन – तेहमिना दुराणी
अनुवाद – श्रीकांत लागू
इदी यांचा जन्म भारतातील पण फाळणीमुळे कराचीला स्थलांतरीत.
‘ आई शाळेत असताना मला दोन पैसे द्यायची आणि सांगायची – एक पैसा कुणा गरीब गरजूला दे आणि एक पैसा स्वतःसाठी खर्च कर आणि ज्याला द्यायचा तो माणूस खरोखरच गरजु आहे का याची खात्री कर.’ शाळेतून घरी परतल्यावर आई चौकशी करायची. खोटं बोलायला वावच नव्हता!!! लहान वयातच ही शिकवण. त्यामुळे पुढील आयुष्यात इदी गरीब, गरजू,आपत्तीग्रस्तांचे मसीहा झाले.
आईनेच सेवाभावी वृत्तीचे बीज पेरल्याने , स्वकष्टाने थोडी रक्कम हातात आल्यावर मीठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांचे जाळे विणले. कुठेही नैसर्गिक व मानवी आपत्ती असेल तर त्वरित इदीचे कार्य सुरू. मृतांना दफन करणं, जखमींना त्वरित दवाखान्यात भरती करणे. ही कामे करत करतच अनेक बेवारस व मतिमंद लोकांना भरती करून त्यांची सेवा शुश्रूषा करणे असा कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत गेला. स्वतः अत्यंत शिस्तबद्ध, कोणतेही काम करण्यास पुढे, पारदर्शक व्यवहार यामुळे त्यांनी स्वतः सारखी शिस्तबद्ध अशी सेवा करण्याची मोठी फळी उभी केली. कित्येक वर्ष केवळ एक रुग्णवाहिका सोबतच सुरू केलेला प्रवास सध्या अनेक रुग्णवाहीका,विमान, हेलिकॉप्टर, मालवाहू वाहने इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. अनेक देशात इदी फाउंडेशन संस्था उभी असून एकाच तत्त्वानुसार काम करत आहे. सेवावृत्तीने काम करणाऱ्या संस्थांना रुग्णवाहिका भेट दिले आहेत.
इदी फाउंडेशनचा वटवृक्ष उभा करताना अनंत अडचणी आल्या, अनेक धमक्या , असंख्य आणि घाणेरडे आरोप करण्यात आले, सत्ताधाऱ्यांनी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.पण इदी डगमगले नाहीत कारण देणारे हातही तितकेच होते. रस्त्यात भीक मागून भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधीची उभारणी केली . अत्यंत साधी राहणी, स्वतःसाठी मोजकाच खर्च, प्रसिद्धीपासून लांब. केवळ सेवाकार्यमानवता ही मूल्य आचरणात आणली. त्यांच्या या कार्यात त्यांच्या कुटुंबियांचे सहकार्य अनमोल आहे.


त्यांचे हे प्रेरणादायी आत्मकथन ‘ केवळ मानवतेसाठी…..’
अनेकदा वाचुन प्रेरणा घेण्यासारखेच आहे.

सुलभा तांबडे

Leave a comment